ZoyaPatel
Ahmedabad

बाहुली...

 




ही कथा आहे अशा एका व्यक्तीची, जिचं काम होतं बाहुल्या सजवणं. ती बाहुल्यांना असं सौंदर्य द्यायची की जग त्यांच्याकडे पाहतच राहायचं. ती बाहुल्या विकताना अभिमानाने सांगायची, "ह्या बाहुल्या कधीच रडत नाहीत, त्या फक्त हसतात. त्या बनल्याच आहेत फक्त सौंदर्य दाखवण्यासाठी!"

पण त्या सौंदर्यामागचं सत्य भयंकर होतं. त्या बाहुल्यांना 'सौंदर्यपूर्ण' बनवण्यासाठी ती व्यक्ती त्यांचे डोळे फोडायची. त्या डोळ्यांतून येणारं पाणी म्हणजेच त्यांचे 'अश्रू', ती 'समजूतदारपणा' नावाच्या बाटलीत भरून ठेवायची. ती त्या बाहुल्यांचे चेहरे विद्रूप करायची, ओठांचे लचके तोडायची आणि दुःख, त्रास, निराशा यांसारख्या सर्व भावना ओरबाडून त्या 'जबाबदारी' नावाच्या पेटीत बंद करून टाकायची. मागे उरायचं ते फक्त चेहऱ्यावर  कृत्रिम हास्य.

इतकंच नाही, तर त्यांचे हात-पाय तोडून ती त्यांना असं बनवायची की ते कोणाचीही मदत करू शकणार नाही. शेवटी ती त्या बाहुलीला आरसा दाखवून विचारायची, "आता दिसतेयस ना सुंदर?" आरशात त्या बाहुलीचं जे प्रतिबिंब दिसायचं, ते हास्य असूनही हास्य वाटत नसे; ती एक जिवंत वेदना असायची.

जेव्हा जगातील माणसं या बाहुल्यांना घरी घेऊन जायची, तेव्हा काही काळाने त्यांचा वापर संपल्यावर किंवा स्वतःचा राग त्यांच्यावर काढल्यावर कचऱ्यात टाकून द्यायचे. रस्त्यावरून चालणाऱ्यांना ती बाहुली कचऱ्यातही हसतानाच दिसायची.

एके दिवशी एका लहान मुलाचं लक्ष त्या कचऱ्यातील बाहुलीकडे जातं. तो म्हणतो, "आई, मला पण अशीच बाहुली हवीय!" त्याची आई त्या तुटलेल्या बाहुलीकडे बघून म्हणते, "बघ, ती बाहुली तुटलेली असूनही कशी हसतेय! तुला पण असंच बनायचं आहे ना? चल, तुला मी अशीच नवीन हसणारी बाहुली घेऊन देते."

ती बाहुली आजही तिथेच पडलेली आहे, एका आशेवर... की कधीतरी कोणीतरी येईल, जो त्या 'जबाबदारीची' पेटी आणि 'समजूतदारपणाची' बाटली फोडेल आणि तिला तिचं हरवलेलं आयुष्य, तिचे अश्रू आणि तिचं खरं रूप परत मिळवून देईल.

आशा बाळगणे खूप चुकीच , आणि त्या बाहुलीला देखील ह्या आशा ह्या आकांक्षा पूर्ण नाही होऊ शकत , पण त्या आशा जर जीवनात जगण्याची उमेद देत असतील तर त्या आशा बाळगण्यात काय चूक...

शेवटी प्रश्न उरतोच...

प्रत्येक वेळी या जगाला हवं तसं बनणं गरजेचं आहे का? कारण ज्या माणसाने त्या बाहुलीला कचऱ्यात टाकलं, तो स्वतः सुद्धा कधीकाळी कोणातरी व्यक्तीने बनवलेली एक 'बाहुलीच' होता ना?


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post